अनमोडचा युवक गोवा येथे अपघातात ठार; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
धारबांदोडा : अनमोड येथील रहिवासी व खानापूर तालुक्यात सर्वदूर परिचित असलेला मष्णू गावडा (वय ३५) याचा रविवारी एका भीषण अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मष्णू व्यवसायाने गवंडी होता व गेली दहा वर्षे गोव्याच्या कुळे गावात आपल्या कुटुंबासोबत राहत होता. रविवारी दुपारी सुमारे १.३० वाजता तो शिगावहून (केए ३० क्यू १९५७ या दुचाकीने) कुळे येथे येत असताना एका वळणावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या (एमएच ०९ इजी १५६६) कारने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की मष्णू याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात दुसऱ्या एका दुचाकीस्वारालाही कारने धडक दिली. तो मोबाईलवर बोलत थांबला होता. मात्र प्रसंगावधान राखून दुचाकीवरून उडी घेतल्याने त्याचे प्राण वाचले.
मष्णू गावडा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण खानापूर व अनमोड परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघातानंतर कुळे पोलिसांनी कारचालक प्रज्वल प्रभूराज पाटील (२३, रा. आमेटे-शिगाव) याच्यावर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. हवालदार दीपक गावस यांनी पंचनामा केला असून पोलिस निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे.