इदलहोंड हादरले! सोसायटी कर्मचाऱ्याचा विहिरीत पाय घसरुन पडल्याने मृत्यू
खानापूर: तालुक्यातील इदलहोंड येथील ३६ वर्षीय दिग्विजय मनोहर जाधव या तरुणाचा आपल्या शेतातील विहिरीत पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी सकाळी उघडकीस आली. दिग्विजय जाधव हे गर्लगुंजी येथील पिसेदेव सोसायटी शाखेत लिपिक पदावर कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दिग्विजय जाधव आज सकाळी ६ वाजल्यापासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली असता, त्यांची दुचाकी त्यांच्या स्वतःच्या शेताजवळील रस्त्यालगत आढळून आली.
या घटनेची माहिती तात्काळ खानापूर येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन ते तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दिग्विजय यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
दिग्विजय याच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगा, आई वडील व एक विवाहित मोठा भाऊ, तीन विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे.
या घटनेची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे. पुढील तपास खानापूर पोलीस करत आहेत.