खानापूर: तालुक्यात 9 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत यापैकी कणकुंबी, कक्केरी, लोंडा, अशोकनगर या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे खाजगीकरण करून त्या ठिकाणी एनजीओ तत्वावर प्राथमिक केंद्रे कार्यरत आहेत परंतु त्या ठिकाणी शासनाच्या मिळणाऱ्या सुविधा त्या भागातील नागरिकांना मिळत नाहीत. शिवाय मोठी गैरसोय होत असल्याकारणाने या भागातील नागरिक त्रस्त आहेत.

यासाठी सदर चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांचे खाजगीकरण रद्द करून ते शासकीय पातळीवर चालवण्यात यावे अशी मागणी खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने आरोग्य मंत्री दिनेश गुंडराव यांच्याकडे करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर उपस्थित होत्या.
यावेळी निवेदनाचा स्वीकार करून आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी त्या चार प्राथमिक आरोग्य केंद्र संदर्भात तातडीने क्रम हाती घेऊन ती शासकीय पातळीवर सुरू करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू अशी ग्वाही पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
यासाठी सदर प्राथमिक आरोग्य केंद्रांचे एनजीओ अर्थात खाजगीकरण रद्द करून ते शासकीय नियमावलीनुसार कार्यरत करावेत अशी मागणी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे, तालुका पत्रकार संघटनेचे सचिव प्रसन्न कुलकर्णी, तालुका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विवेक गिरी, तालुका पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष वासुदेव चौगुले, अल्ताफ बसरीकट्टी, कासिम हट्टीहोळी, प्रसाद पाटील, बसवराज आदी उपस्थित होते.
