लाठीमेळा, ढोलताशा आणि देखावे; खानापुरात शिवभक्तांची एकच गर्दी
शिवजयंतीनिमित्त खानापूरात ‘हिस्ट्री लाईव्ह’ अनुभव; तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग
खानापूर (प्रतिनिधी) – ढोलताशांच्या निनादात, भगव्या पताकांनी सजलेल्या रस्त्यांवरून चाललेली भव्य चित्ररथ मिरवणूक म्हणजे जणू ‘हिस्ट्री लाईव्ह’ अनुभव होता. खानापुरात शिवजयंतीनिमित्त पार पडलेली ही मिरवणूक केवळ परंपरेचा भाग नव्हती, तर इतिहास जिवंत करण्याचा एक उत्स्फूर्त प्रयोग ठरली.
यावेळी तरुणांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत विविध मर्दानी खेळ, लाठीकाठी व तलवारबाजीची प्रात्यक्षिके सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. मुलींचा सहभागही लक्षणीय ठरला.
शिवरायांचा स्वाभिमान, संभाजी राजांचे बंधुत्व आणि तानाजींचा पराक्रम
चित्ररथांमधून विविध देखावे साकारण्यात आले. त्यामध्ये औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांनी दाखवलेला स्वाभिमान, शिवाजी-संभाजी यांचे आदर्श नाते, तसेच तानाजी मालुसरे यांचा सिंहगड युद्धातील पराक्रम या देखाव्यांनी प्रेक्षकांना इतिहासाच्या प्रवासात नेले.
ग्रामीण भागातून लोटलेली गर्दी
शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काहींनी पहाटेपर्यंत मिरवणूक पाहत उत्सव साजरा केला.
गण्यमान्यांचा गौरव आणि कलाकारांचे कौतुक
शिवस्मारक चौकातून सुरू झालेल्या या मिरवणुकीला आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. कलाकारांच्या सादरीकरणाला त्यांनी मनःपूर्वक दाद दिली.