खानापूर

मलप्रभा क्रीडांगणाच्या दुर्दशेमुळे खेळाडू अडचणीत; तातडीने विकासाची मागणी

खानापूर :  येथील मलप्रभा क्रीडांगण होऊन अकरा वर्षे उलटली आहेत. मात्र, या क्रीडांगणात खेळाडूंसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे क्रीडांगणाचा उद्देश पूर्णपणे असफल ठरला आहे.

संग्रहित

तत्कालीन आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या प्रयत्नांतून जांबोटी क्रॉस येथे मलप्रभा क्रीडांगणाची निर्मिती करण्यात आली होती. शासनाने या ठिकाणी जागा मंजूर करून सपाटीकरण केलं आणि एका बाजूला गॅलरी बांधली. मात्र, या क्रीडांगणाचा इतर कोणताच विकास झालेला नाही. आतापर्यंत निवडून आलेल्या सर्वच लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केलं आहे. इतकंच नव्हे, तर शासनाकडूनच क्रीडांगणाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने मैदानाचे क्षेत्रही आकुंचित होत आहे.

येत्या 27 तारखेपासून या मैदानावर तालुकास्तरीय खानापूर प्रीमियर लीग आयोजित होत आहे. मात्र, मैदानाच्या खराब स्थितीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मैदानावर गवत पूर्णपणे वाढले असून, खेळाडूंना खेळताना अडचणी येत आहेत. लीग जवळ आल्याने आयोजकांनी सध्या या मैदानाची थोडी डागडुजी सुरू केली आहे.

व्यापार संकुलाच्या मागील बाजूस चेंजिंग रूम, स्वच्छतागृहे, सामान ठेवण्यासाठी खोल्या, क्रीडा खात्याचे कार्यालय आणि प्रेक्षकांसाठी गॅलरी निर्माण केली जाऊ शकते. त्याचबरोबर धावपटूंसाठी ट्रॅक, व्हॉलिबॉल, थ्रोबॉल, खो-खो, लांब उडी, उंच उडी, कुस्ती आखाडा आणि अन्य मैदानी खेळांसाठी ग्राऊंड तयार करता येईल. यासाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून क्रीडांगणाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी केली आहे.

भविष्यात हे क्रीडांगण तयार झाल्यास, तालुक्यातील खेळाडूंना सरावासाठी मैदान उपलब्ध होईल, आणि यामुळे राष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू तयार होतील. अलीकडच्या काळात अनेक क्रीडापटू तयार होत आहेत. काही खेळाडूंनी राज्यस्तरावर तसेच राष्ट्रीयस्तरावर उल्लेखनीय कामगिरी देखील केली आहे. पण, सरावासाठी योग्य मैदान नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. यामुळे खानापूर शहरातील क्रीडांगणाचा तातडीने विकास होणं अत्यंत आवश्यक आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते