हलशीतील दोन चोरांनी केली तब्बल सव्वा किलो सोने आणि दीड किलो चांदीची घरफोडी
खानापूर: तालुक्यातील हलशी गावातील दोन तरुणांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. विक्रम उर्फ राजू बाळू कित्तूरकर (वय 31) व महादेव नारायण धामणेकर (दोघेही रा. हलशी, ता. खानापूर) अशी त्यांची नावे आहेत.
घरफोड्यातील तब्बल 1 किलो 200 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 किलो 430 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 86 लाख 26 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
पंडित म्हणाले, पोलिस निरीक्षक कळमकर यांनी वाढत्या घरफोड्या रोखण्यासाठी पथके तयार करून,
गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन भौगोलिक स्थिती, गुन्हा करण्याची पद्धत याची माहिती घेण्याची सूचना केली होती. हा तपास करत असताना कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक गुन्हा विक्रम कित्तूरकर याने त्याच्या साथीदारांसह केल्याचे आढळून आले.
कळमकर यांना कित्तूरकर हा घरफोडीतील दागिने विक्री करण्यासाठी मुरगूड ते सिद्धनेर्ली रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार १९ ऑगस्ट रोजी पथकाने सापळा रचून कित्तूरकर याला अटक केली. त्याच्याकडून ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी कित्तूरकरकडे सखोल चौकशी केली असता, साथीदार धामणीकर याच्यासह त्याने आठ महिन्यांत अनेक घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी धामणेकर याला कर्नाटकात जाऊन अटक केली.
कित्तूरकर व धामणेकर हे घरफोडीतील दागिने वाटून घेत होते. कित्तूरकर याच्याकडून त्याच्या वाटणीस आलेले चोरीचे दागिने फेडरल बँक, खानापूर येथे तारण ठेवलेले २३३ ग्रॅम, तसेच धामणेकर याच्याकडून ६९४ ग्रॅम सोन्याचे व ४५० ग्रॅम चांदीचे दागिने, तसेच मुथूट फिनकॉर्प खानापूर यांच्याकडील दागिने, गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली इतर साहित्य जप्त केले. तसेच कित्तूरकर याने मुथूट फिनकॉर्प खानापूर येथे चोरीचे तारण ठेवलेले २० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोघेही फायनान्स कंपनीकडे दागिने तारण ठेवून गोव्यात जाऊन चैनी करत होते. दोघांकडून १३ घरफोड्या उघडकीस आल्या आहेत, असेही पोलिस अधीक्षक पंडित यांनी सांगितले.
https://chat.whatsapp.com/FrPJdrQ4DQUAX5YmcccB4s
khanapur halshi village
source: Pudhari