खानापूर तालुक्यातील गवंडी कामगाराची गळा दाबून हत्या; सुळगा (हिंडलगा) येथील शेडमध्ये मृतदेह आढळला
बेळगाव (14 जून) – खानापूर तालुक्यातील गस्टोळी दड्डी येथील कुबेर देमाण्णा दळवाई (वय 36) या गवंडी कामगाराचा गळा दाबून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सुळगा (हिंडलगा) येथील एका खासगी लेआऊटमधील शेडमध्ये घडली असून, शुक्रवारी (13 जून) सकाळी कुबेरचा मृतदेह आढळून आला.
कुबेर हा त्या परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या लेआऊटमध्ये गवंडी म्हणून काम करत होता. तो व त्याचे काही साथीदार याच परिसरातील एका तात्पुरत्या शेडमध्ये राहात होते. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह गळा आवळलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच काकती पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश शिंगे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या शवविच्छेदन कक्षात पाठवला आहे. शनिवारी (14 जून) रोजी मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, खून झाल्यानंतर शेडमध्ये राहणारे इतर साथीदार फरार झाल्याचे समजते. त्यामुळे हत्या नेमकी कोणी व कोणत्या कारणासाठी केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली असून, फरार साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांची चौकशी झाल्यानंतरच हत्येच्या पार्श्वभूमीचा उलगडा होणार आहे.