खानापूर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप
खानापूर : तालुक्यातील संगरगाळी येथील रहिवासी विष्णू परशुराम कडोलकर (वय 35) याला एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्याखाली बेळगाव येथील विशेष पोक्सो न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्याला 30 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
ही घटना 2024 साली घडली होती. आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केले होते. या गंभीर गुन्ह्याबाबत खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची प्रभावी कामगिरी
या प्रकरणाचा तपास खानापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामचंद्र नाईक यांनी केला. त्यांना तपास सहाय्यक म्हणून मंजुनाथ मुसळी यांनी मदत केली. तसेच, न्यायालयीन प्रक्रियेत कोर्ट ड्युटी अधिकारी प्रवीण होंदड यांनी सहकार्य केले. या सर्व तपास यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीमुळेच आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करणे शक्य झाले.
न्यायालयात आरोप सिद्ध
बेळगाव येथील माननीय विशेष पोक्सो न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने मांडलेल्या पुराव्यांमुळे आरोपीवरील आरोप निर्विवादपणे सिद्ध झाले.
सरकारी पक्षाचे अभियोक्ता एल. व्ही. पाटील यांनी न्यायालयात या प्रकरणाची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली. सर्व पुरावे आणि युक्तिवाद विचारात घेत, न्यायालयाच्या माननीय न्यायाधीश सौ. सी. एम. पुष्पलता यांनी आरोपीला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली.
या निर्णयामुळे समाजातील अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांना कठोर संदेश मिळाला आहे.