मावशीकडे आलेल्या युवकाचा तलावात बुडून अपघाती मृत्यू, गावात हळहळ
खानापूर: तालुक्यातील देमिनकोप गावाजवळील तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. मृत युवकाचे नाव तरुण चलवादी (वय २१) असून तो कंचनोळी, ता. हल्याळ येथील रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, कोडचवाड येथील श्री कलमेश्वर देवाची यात्रा सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी होणार असून, त्या निमित्ताने तरुण आपल्या मावशीकडे आला होता. आज घरात स्वच्छता करून कपडे धुण्यासाठी कुटुंबीय तलावावर गेले होते. त्यावेळी तरुण पोहण्यासाठी तलावात उतरला. मात्र पोहण्याचा विशेष सराव नसल्याने तो पाण्यात बुडाला व कुटुंबीयांच्या डोळ्यासमोरच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली.
घटनेनंतर परिसरातील अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व शोध सुरू केला. मात्र तो सापडला नाही, म्हणून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. नंदगड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून, हवालदार वस्त्र व त्यांच्या टीमने पंचनामा केला आहे.