खानापूर बस स्थानकावर मराठी भाषेला स्थान न दिल्यास तीव्र आंदोलन
खानापूर: येथे बांधण्यात आलेल्या नूतन बस स्थानकाचे काम आता शेवटच्या टप्प्यात असून येत्या जून महिन्यात या स्थानकाचे उद्घाटन देखील होणार आहे. पण या नूतन बस स्थानकावरील नाव हे फक्त कन्नड आणि इंग्रजी भाषेत लिहले गेल्याने मराठी जनता दुखावली गेली आहे.
याबद्दल खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने आवाज उठवला असून, खानापूर हा मराठी बहुभाषिक तालुका असून येथील जनतेसाठी बोर्ड हा कन्नड आणि इंग्रजी भाषेबरोबर मराठीतही असावा अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे.
मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने खानापूर बस स्थानकावर मराठी भाषेला स्थान न दिल्यास तीव्र आंदोलन तसेच न्यायालयात जाऊ असा इशारा दिला आहे. म.ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन बुधवार दिनांक 22 रोजी सकाळी आगार व्यवस्थापक महेश तीरकनंवर यांना सादर केले.
आगार व्यवस्थापक महेश तीरकनंवर यांनी निवेदनाचा स्वीकार करून वरिष्ठांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी खानापूर तालुका समितीचे आबासाहेब दळवी, संजीव पाटील, ऍड. अरुण सरदेसाई, गोपाळ पाटील, रमेश धबाले, पुंडलिक पाटील, अभिजीत सरदेसाई, मुकुंद पाटील, नागेश भोसले, संदेश कोंडवाडकर, प्रभू कदम, भास्कर पाटील आदी उपस्थित होते.
“खानापूर हा मराठी बहुल भाग आहे. त्यामुळे येथे मराठी भाषेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. पण जाणीवपूर्वक मराठी भाषेला डावलण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे खानापूर तालुका रुग्णालय, खानापूर बस स्थानक येथे मराठीतून फलक लावण्याची मागणी केली आहे.
श्री. आबासाहेब दळवी सरचिटणीस म.ए.समिती खानापूर
खानापूर रुग्णालयावर देखील मराठीला स्थान हवे
नव्याने उभारण्यात आलेल्या खानापूर सरकारी रुग्णालयाच्या इमारतीवर देखील मराठी भाषेतून फलक लावावेत तसेच सर्व प्रकारचे कागद माहिती मराठीतही देण्यात यावी यासाठी म.ए समितीच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. महेश कवीदासन्नावर यांना निवेदन सादर केले. तसेच लवकरात लवकर मराठी फलक लावण्याची मागणी करण्यात आली.