खानापूर: पुरातन “बाहुबली” मूर्तीच्या चोरीमुळे आक्रोश! गावकऱ्यांचे पोलीस स्थानकात आंदोलन
खानापूर: तालुक्यातील बीडी-गोलीहळी येथील गावठाणात असलेली पुरातन काळातील बाहुबलीची मूर्ती अज्ञात्याने एका गाडीतून नेल्याने गावात एकच आक्रोश निर्माण झाला. परिणामी ग्रामस्थांनी नंदगड पोलीस स्टेशन गाठून जमीन मालका विरोधात तक्रार दाखल करून याची कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान पोलिसांनी शोध घेऊन त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाबाबत मिळालेली माहिती की, बिडी जवळील गोलीहळी येथे गावचे जवळपास 62 गुंठे गावठाण होते. सदर गावठाण काही वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी येथील एका मौलानाला दान स्वरूपात दिले होते. पण त्या जागेत आठव्या शतकातील जैन तीर्थंकर बाहुबली ची मूर्ती आहे. या गावठाण जमिनीतील मूर्तीच्या परिसरात काही काळापासून मुस्लिम समाजासाठी स्मशानभूमी ही असल्याचे नमूद केले होते. पण त्या मौलानाच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसदाराने सदर जमीन जवळच असल्या कडतन बागेवाडी येथील शंकर गोळेकर व त्यांचे बंधू बसप्पा गोळेकर यांना विक्री केली होती. त्यानंतर गोळेकर बंधूंनी सदर जागेवर प्लॉट टाकून ती विकण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी पूर्वीपासून काही जमिनीत स्मशानभूमी व काही जमिनीत पुरातन काळापासून बाहुबलीची मूर्ती असल्याने त्या जमिनीतील प्लॉट विक्री होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पण या ठिकाणचे पूर्वीचे अस्तित्व नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी असलेली पुरातन बाहूबलीची मूर्ती नजरेआड करण्याच्या दृष्टीने काहींनी त्या मूर्तीला चोरी करण्याचा किंवा लपवण्याचा प्रयत्न केला असावा. काल या ठिकाणी असलेली मूर्ती काही अज्ञात व्यक्तींनी एका गाडीतून घेऊन जाताना शाळकरी मुलांनी पाहिले होते. त्यावेळी त्या मुलानी त्या मूर्ती घेऊन जाणाऱ्या लोकांना अडवले पण न ऐकता ती मूर्ती घेऊन गेले. त्या मुलांनी गावात येऊन गावठाण मधील बाहुबलीची मूर्ती गेल्याचे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थात एकच असंतोष निर्माण झाला. त्या मूर्ती घेऊन गेलेल्या वाहनाचा शोध घेऊन पोलीस ठाणे गाठले. त्या वाहन चालकाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तातडीने त्या वाहनाला ताब्यात घेतले व मूर्तीही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून ठेवली. पण तेवढ्याने ग्रामस्थ शांत झाले नाहीत. संपूर्ण ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन गाठून ठिय्या आंदोलन छेडले व गावातील दैवताची अशी अहवेलना करून त्या जमिनीची परस्पर विक्री करण्याच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात यावी व त्या दैवताचे रक्षण करून पुन्हा प्रतिष्ठापना करावी. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मागणी गावातील प्रमुख नागरिक शिवाजी ईश्वर गुरव, इराप्पा सात्ताणावर, महेश कुणकीकोप, उमेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील सह शेकडो नागरिक याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत नंदगड पोलीस ठाण्यात ग्रामस्थ मांडून बसले होते. त्यामुळे या बाहुबलीच्या मूर्तीच्या चोरी प्रकरणावरून ग्रामस्थात असंतोष निर्माण झाला आहे.