वर्षातून एकदाच उघडणाऱ्या जंगलातील कवळेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
खानापूर: महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर बेळगांव आणि खानापूरसह विविध भागांतून आलेल्या भाविकांनी दांडेलीतील गुफामंदिरात स्थित पांडवकालीन ‘कवळेश्वर’ शिवलिंगाचे दर्शन घेतले. वर्षातून केवळ एकदाच उघडल्या जाणाऱ्या या प्राचीन शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

आजच्या एका दिवसाच्या विशेष पूजनानंतर संध्याकाळी 6 वाजता मंदिराचा दरवाजा पुन्हा वर्षभरासाठी बंद करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक जमू लागले होते. बेळगांव, खानापूर, गोवा आणि कर्नाटकमधील विविध भागांतील श्रद्धाळूंनी येथे हजेरी लावली. सकाळपासूनच ‘हर हर महादेव’ आणि ‘शंभो शंकरा’च्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते.
गुहेत स्थित शिवलिंगावर दुग्धाभिषेक, बेलपत्र अर्पण आणि विशेष पूजा विधी पार पडले. हे मंदिर जंगलात 6 किलोमिटर आत असल्याने भाविकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी स्वयंसेवकही कार्यरत होते.
शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी परिसरातील अन्य धार्मिक स्थळांना भेटी दिल्या आणि या पवित्र क्षणाचा आनंद घेतला. महाशिवरात्री निमित्त आयोजित महाप्रसादाचा लाभ अनेकांनी घेतला.

गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिराची ऐतिहासिक महती जपली जात आहे. स्थानिक पुरोहितांच्या मते, या मंदिराला प्राचीन काळापासून असलेले महत्त्व आणि वर्षातून एकदाच होणारे दर्शन भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरते.
आजच्या कार्यक्रमानंतर मंदिराचा दरवाजा पुन्हा पुढील वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी उघडला जाईल. त्यामुळे भाविकांनी या दुर्मीळ संधीचा लाभ घेत महादेवाचे दर्शन घेतले.

