कर्नाटक सॉफ्ट बॉल क्रिकेट असोसिएशनतर्फे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन: आयपीएलच्या धर्तीवर भव्य स्पर्धांचे नियोजन
बेळगाव: Karnataka State SoftBall Cricket Association कर्नाटक सॉफ्ट बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने राज्यभरात आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एक टीम दिली गेली असून, बेळगाव जिल्ह्यासाठी “राजा शिवाजी बेळगावी” नावाची टीम तयार करण्यात आली आहे. या टीमचे प्रायोजकत्व डॉ. अंजलीताई फाउंडेशनने स्वीकारले आहे. स्पर्धा 1 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत बेंगळुरू येथे खेळवली जाणार आहे.
आज बेळगावमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत “राजा शिवाजी बेळगावी” या टीमच्या लोगोचे अनावरण करण्यात आले तसेच स्पर्धेच्या आयोजनाबाबतची माहिती देण्यात आली. या वेळी कर्नाटक राज्य सॉफ्ट बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री गंगाधर राजू, डॉ. अंजलीताई फाउंडेशनचे सुरेश जाधव, मिलींद भाऊ, बेनी पिंटो, नगरसेवक तोहीद चांदखन्नावर, संदीप देसाई आणि टीमचे खेळाडू उपस्थित होते.
गंगाधर राजू यांचा सत्कार करण्यात आला आणि प्रत्येक खेळाडूचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. श्री. राजू यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, “आयपीएलमध्ये सर्वांना संधी मिळत नाही. गल्ली क्रिकेटमध्ये अनेक होतकरू खेळाडू असतात, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आयपीएलच्या धर्तीवर नियोजन करण्यात आले असून, खेळाडूंची लिलाव प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे.”
उपस्थित सर्व मान्यवरांनी “राजा शिवाजी बेळगावी” टीमला शुभेच्छा दिल्या.
Karnataka State SoftBall Cricket Association (@kssca_official)