खानापूर

करंबळ ग्रामपंचायत सदस्य उदय भोसले यांचा अपघाती मृत्यू; देसूरजवळ कारने दिली जोरदार धडक

देसूर (ता. खानापूर) | 19 मे 2025 – कौंदल (ता. खानापूर) येथील सुपुत्र आणि करंबळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य उदयनारायण भोसले (वय ३२) यांचे सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजता भीषण अपघातात निधन झाले.

भोसले⁠ हे आपल्या मित्रासमवेत खानापूर–बेळगाव राष्ट्रीय महामार्गाने (एनएच-४८) बेळगावकडून खानापूरकडे परतत असताना देसूरजवळील उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात कारने जोराची धडक दिली. या अपघातात ते जागीच ठार झाले, तर त्यांच्या सोबत असलेले करंबळ गावचे सैनिक प्रशांत पाटील जखमी झाले. पाटील यांना तत्काळ बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भोसले⁠ हे भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत पक्षाचा खंदा कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण केली होती. गेली चार वर्षे करंबळ ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांनी गावात पाणीपुरवठा, रस्ते संरक्षण भिंती इत्यादी अनेक विकासकामे राबवली. मनमिळावू स्वभाव व गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अखंड धडपड करणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती.

अपघाताची माहिती कळताच आमदार विठ्ठल हलगेकर, माजी जि.प. सदस्य प्रमोद कोचेरी, भाजप तालुकाध्यक्ष गुंडू तोपिनकट्टी, मल्लाप्पा मारीहाळ, राजू सिद्धाणी, भरमणी पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली व कुटुंबीयांचे सांत्वन केले. पोलीसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

भोसले⁠ मागे पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे खानापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी कौंदल येथे शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?