कणकुंबीत शालेय मुलांसाठी रायडर्सकडून गोड मिठाई आणि ज्ञानाचा खजिना
वार्ताहर/कणकुंबी
बेळगाव येथील ‘बायकिंग ब्रदरहुड’ मोटरसायकल रायडिंग ग्रुपच्या 40 युवकांनी यावर्षीचा 76 वा प्रजासत्ताक दिन खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथील श्री माऊली विद्यालयात साजरा केला.
बेळगावहून सकाळी 7 वाजता हे रायडर कणकुंबीकडे निघाले. ठीक 7.30 वाजता हे सर्व रायडर माऊली विद्यालयाच्या प्रांगणात पोहोचले. त्यांनी शाळेच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला मानवंदना दिली.
मुख्याध्यापक एस.जी. चिगुळकर यांनी ‘बायकिंग ब्रदरहुड’चे सदस्य गजेंद्र यादव, सिद्धांत पाटील, प्रवीण कुलकर्णी, अमित राऊत, दीपक हिरेमठ, महेश हसबे व इतर रायडर्सचे स्वागत केले.
रायडर्सनी विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाशी संबंधित प्रश्नमंजुषा घेतली आणि उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे दिली. सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांमध्ये मुख्याध्यापक एस.जी. चिगुळकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष महेश नाईक, निवृत्त सुभेदार मेजर चंद्रकांत कोलीकर, ग्रामपंचायत अध्यक्षा दीप्ती गवस आणि माजी अध्यक्ष रमेश खोरवी यांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला गावातील नागरिक, माजी विद्यार्थी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.