तालुक्यात रेशन वाटपात अनियमितता, दुकानदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत
खानापूर: तालुक्यातील रेशन वाटप योजनेत गंभीर अनियमितता समोर आली असून, यावर कठोर कारवाईचा इशारा तालुका रेशन वाटप कमिटीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी दिला आहे. तालुक्यातील काही रेशन दुकानदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गोरगरीब जनतेला त्यांच्या हक्काचे रेशन पूर्णपणे मिळत नसल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संपूर्ण महिन्याभर तपासणी आणि छाननी केल्यानंतर उघडकीस आले की, काही दुकानदार रेशनमध्ये कपात करत आहेत, तर काही प्रकरणांमध्ये तालुका अन्न पुरवठा खाते आणि मार्केटिंग सोसायटीकडूनच जवळपास दीड क्विंटलपर्यंत तांदूळ कमी पुरवठा केला जात आहे. “हा तांदूळ नेमका जातो कुठे?” असा थेट सवाल करत कुलकर्णी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
यावेळी तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष आय.आर. घाडी यांनीही आपला रोष व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी नाईक व तालुका अन्न पुरवठा अधिकारी नदाफ यांच्या दबावामुळे पुरवठ्यात गोंधळ निर्माण होत आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका ब्लॉक काँग्रेसने यापूर्वीही अनेक गैरव्यवहारांवर लक्ष ठेवून त्याविरोधात आवाज उठवला असून, याही प्रकरणी मागे न हटता कारवाईसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
80 टक्के रेशन पुरवठा सुरळीत – कुलकर्णी
गेल्या महिन्यात नागरिकांना पंधरा किलो तांदूळ सुरळीत मिळावा म्हणून रेशन दुकानदारांना भेटी देऊन जनजागृती करण्यात आली होती. तालुक्यातील प्रसारमाध्यमांच्या सक्रिय सहभागामुळे तब्बल 80 टक्के पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली.
“ज्या दुकानदारांकडून चुकीच्या पद्धतीने सह्या घेतल्या जात आहेत, त्या प्रकरणांचाही तपास करण्यात येत असून दोषींवर कारवाई होणारच,” असेही ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला तालुका ब्लॉक काँग्रेसचे नेते महातेश, गुड्डू टेकडी, इशाक पठाण आणि रेशन कमिटीचे सदस्य उपस्थित होते.