हलशी श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूलच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
हलशी (ता. खानापूर) : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने नुकतीच पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल, हलशी येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा लौकिक वाढविला आहे.
या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थिनींनी एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली आहे.
सुचिता जोतिबा देसाई हिने ६५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक जिंकले. तर खुशी विलास सुतार हिने ६९ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवला, तसेच गौरी कुंभार हिने ४६ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचा सन्मान वाढविला.
या यशात शाळेचे मुख्याध्यापक श्री. किरण देसाई सर, क्रीडा शिक्षिका श्रीमती शामल बेळगावकर तसेच सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारीवर्ग यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व विद्यार्थिनींचे सर्वत्र अभिनंदन होत असून, शाळेच्यावतीने त्यांना राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.