गुंजी (ता. खानापूर): तालुक्यातील गुंजी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अस्वलांच्या सततच्या वावराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शाळेच्या परिसरात दोन अस्वलांचा आठवडाभरापासून वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. शाळेजवळील हनुमान मंदिरात अस्वलांचे वास्तव्य असल्याचे नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे गुंजी शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक चिंतेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापनाने पालकांना मोबाइल संदेश पाठवून विनंती केली आहे की, “आपल्या मुलांना वेळेपूर्वी शाळेत पाठवू नका. शाळेच्या वेळेतच सोडा आणि शक्य असल्यास स्वतः त्यांना शाळेत सोडून जा.”
व्हिडिओ: काही दिवसांपूर्वी गुंजी स्टेशनजवळ देखील अस्वल दिसले होते.
या घटनेवरून वनखात्याच्या हलगर्जीपणावरही बोट ठेवले जात आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि शाळा सुधारणा समितीने अजूनही याबाबत अधिकृत तक्रार न केल्याने वनविभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या आतच ठेवून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
अस्वलाचा वावर आणि शाळेची जीर्ण अवस्था – दोन्ही गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची चिंता पालक व्यक्त करत आहेत. वनखात्याने याकडे तात्काळ लक्ष देऊन अस्वलांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी सध्या ग्रामस्थांकडून केली जात आहे.
#गुंजी #अस्वल #शाळेचीसुरक्षा #वनखात्याचेदुर्लक्ष #खानापूरवृत्त