गोवा हादरले! जत्रेत भीषण चेंगराचेंगरी: 6 भाविकांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी
पणजी (३ मे): शिरगाव येथील प्रसिद्ध देवी लईराईच्या जत्रोत्सवात पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत आतापर्यंत ६ भाविकांचा मृत्यू झाला असून, 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काही धोंड भक्तांचाही समावेश आहे. Lairai Zatra in Shirgaon
प्राप्त माहितीनुसार, पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास होमकुंडाकडे जाताना गर्दीमुळे सुरुवातीला दोन भाविक जमिनीवर पडले, त्यानंतर गोंधळ उडाल्याने चेंगराचेंगरी झाली. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांवर अनेक धोंड भक्त कोसळले. यामध्ये काहींना वीजपुरवठा करणाऱ्या तुटलेल्या वायरमुळे करंट लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच, कोयते व इतर धारदार अवजारे विकणाऱ्या दुकानांवर कोसळल्याने अनेक भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना घडली त्यावेळी जत्रेला सुमारे २ लाख भाविक उपस्थित होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले, मात्र गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले.
चेंगराचेंगरीनंतर म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात ३० जणांना दाखल करण्यात आले होते, त्यापैकी ४ भाविकांचा मृत्यू झाला. डिचोली रुग्णालयात आणखी २ भाविकांचा मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर म्हापसा, डिचोली आणि गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. गोमेकॉमध्ये सध्या ६ जणांवर उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत cm promod Sawant यांनी तात्काळ डिचोली आरोग्य केंद्राला भेट देऊन जखमी भाविकांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी म्हापसा जिल्हा इस्पितळात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू असून, सुरक्षेच्या उपाययोजना आणि चेंगराचेंगरीचे नेमके कारण शोधले जात आहे.
— खानापूरवार्ता