ट्रक-बोलेरो अपघात: क्लीनर जागीच ठार, चालक जखमी
रामनगर: गोवा-बेळगाव महामार्गावरील तिनईघाट येथे गुरुवारी पहाटे सुमारे तीनच्या सुमारास भीषण अपघात घडला. कर्नाटकातून गोव्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात तिर्थकुंडे (ता. खानापूर) येथील रामा इरप्पा कोडती (वय 45) हा क्लीनर जागीच ठार झाला, तर वाहन चालक संतोष पाटील (रा. बेळगाव) हा गंभीर जखमी झाला आहे.
कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपने (गाडी क्रमांक: 00000PKA2208276) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की कोडती याचा मृतदेह चेंदामेंदा झाला. रामनगर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने गाडी बाजूला करून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रामनगर येथील रुग्णालयात हलवला. याप्रकरणी रामनगर पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.
हा अपघात नेमका का घडला, याची चौकशी सुरू आहे. स्थानिक नागरिक व वाहनचालकांच्या मते, रामनगर ते अनमोडदरम्यान रात्रीच्या वेळी अनेक ट्रकचालक रस्त्यावरच ट्रक थांबवून त्यात झोपतात. यामुळे याअगोदरही अनेक अपघात झाले आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी रस्त्यावर अवजड वाहने थांबवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.