गर्लगुंजी बस थांबे वगळल्याने ग्रामस्थ संतप्त; रस्ता रोको आंदोलन यशस्वी
गर्लगुंजी, ता. खानापूर (जि. बेळगाव): बेळगावहून गर्लगुंजीकडे जाणाऱ्या सेटल बस नंदिहळी मार्गे वळवण्यात आल्यामुळे गर्लगुंजी ते राजहंसगड या दरम्यान असलेल्या तीन बस थांब्यावरील नागरिक तसेच विद्यार्थी यांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. या प्रकारामुळे गावातील विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच नागरिकांचे रोजचे कामकाज विस्कळीत होत होते.

गर्लगुंजी ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नातून पूर्वी बेळगाव ते गर्लगुंजी या मार्गावर थेट सेटल बस चालू करण्यात आली होती. मात्र खासदार जगदीश शेट्टर यांनी केएसआरटीसीला दिलेल्या पत्रामुळे बस नंदिहळी मार्गे वळवण्यात आली. याशिवाय दुसरी बस आमदार विठल हल्गेकर यांच्या पत्रानुसार तोपिनकट्टीपर्यंत नेण्यात येत होती. त्यामुळे गर्लगुंजीतील महत्त्वाचे बस थांबे दुर्लक्षित होत होते. यामुळे वेळापत्रकात बदल झाला आणि प्रवाशांची, विशेषतः विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होऊ लागली.
या संदर्भात ग्रामपंचायतीने अनेकदा बेळगाव डेपो व्यवस्थापकांना विनंती केली; मात्र काहीच मार्ग निघत नसल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलनाचा निर्णय घेतला. सुमारे तीन तास चाललेल्या चक्काजाम आंदोलनामुळे प्रशासन हलले आणि खानापूर डेपो मॅनेजर श्री. लमाणी व कंट्रोलर यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.
या प्रसंगी खानापूर पोलीस निरीक्षक श्री. गवंडी यांनी आंदोलक नागरिकांशी संवाद साधला. स्थानकातून २ एएसआय, २ हवालदार आणि इतर पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. “जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत रस्ता खुला करणार नाही,” असा ठाम निर्धार ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
गावातील बसेस त्या गावापुरतेच मर्यादित ठेवाव्यात, अशा स्वरूपाची ठाम मागणी यावेळी नागरिकांनी केली.
या आंदोलनात पुढील प्रमुख ग्रामस्थ व युवक उपस्थित होते: गोपाळ मुरारी पाटील, पांडुरंग सावंत, हणमंत मेलगे, अजित पाटील, सुरेश मेलगे, प्रसाद पाटील, मऱ्यापा पाखरे, सोमनाथ यरमाळकर, गोकुळ चौगुले, विनोद कुंभार, मारुती पाटील, लक्ष्मण मेलगे, शांताराम मेलगे, सुनील पाटील, पुंडलिक पाटील, अनिल मेलगे, श्री. पाटील, श्रेयस निटूरकर, नारायण कोलेकर, बाबुराव मेलगे, कलापा लोहार, मऱ्यापा मरकट्टी, विलास पाटील, मारुती कोलकार, चनापा बुरुड, सदानंद पाटील, चनापा मेलगे, महेश करेगार आणि इतर ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.