खानापूरच्या लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासन: शेतकऱ्यांमध्ये नाराजी
खानापूर: निलावडे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील गवळीवाडा, आंबोळी गावच्या शिवारातील पिकांचे नुकसान एका हत्ती कडून सुरूच आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शिवाराची नुकसान रोज उघड्या डोळ्यांनी पाहावी लागत आहे. सर्वे नंबर 46 व 56 मधील उस, भात, केळी आदी पिकांचे हत्ती अतोनात नुकसान करत आहे. या भागातील शिवारात मे महिन्यापासून हत्तीने मुक्काम ठोकला आहे. नुकताच भात पेरणी झाली आहे. तोच पुन्हा हत्तीने शिवारात धुमाकुळ घातला आहे.
भात व केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान सुरु आहे. एवढेच नव्हे, तर शेतातील पाईप लाईनचेही नुकसान केले आहे.
निलावडे – गवळीवाडा येथील शेतकरी रमेश नाईक यांच्या शेतातील झोपडी उध्वस्त करुन कृषी उपकरणांचे मोठे नुकसान केले आहे. तर मजहर खानापुरी यांच्या शेतातील
पाणीपुरवठ्याची पाईपलाईन उचकटून टाकल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. नाना गवळी, पुंडलिक उचगावकर, बडसकर आदी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
लोकप्रतिनिधींकडून नुकसानीची पाहणी: पदरी फक्त आश्वासन
काही दिसांपूर्वी अधिकारी आणिलोकप्रतिनिधींचा दौरा झाला होता. हत्तीचा बंदोबस्त करण्याचे आश्वासनही देण्यात आले. पण ही, समस्या आजही जशाच तशी आहे. आता फोन केल्यानंतर फोन देखील उचलला जात नाही. असे येथील शेतकरी सांगत आहेतं
आठ दिवसांपूर्वी दुचाकीवरुन घरी जाणाऱ्या शेतकऱ्याची हत्तीशी गाठ पडली. केवळ देव बलवत्तर म्हणून तो हत्तीच्या तावडीतून बचावला. मात्र, दुचाकीवरुन पडल्याने त्याच्या हातापायांना मार लागला. त्यामुळे, एखादा जीव गेल्यावरच वनखात्याला जाग येणार का, असा सवाल केला जात आहे.