शॉर्ट सर्किटने माणिकवाडी हादरले, झाड कोसळून विजेचा खांब घरावर
खानापूर (प्रतिनिधी): माणिकवाडी (ता. खानापूर) येथे मंगळवारी रात्री सुमारे अकरा वाजता सततच्या रिपरिप पावसामुळे प्राथमिक मराठी शाळेजवळील सागवानी झाड कोसळून दोन विद्युत खांबांवर पडले. या घटनेत एक खांब शावेर परेरा यांच्या घरावर कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र विद्युत वाहिन्यांचा एकमेकांशी संपर्क झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन जोरदार आवाज झाला आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

झाड कोसळल्याचा आवाज व शॉर्ट सर्किटमुळे निर्माण झालेला गोंगाट ऐकून युवा कार्यकर्ते महादेव गावडा व शावेर परेरा जागे झाले. त्यांनी तात्काळ ग्रामपंचायत सदस्य प्रा. शंकर गावडा यांना याची माहिती दिली. प्रा. गावडा यांनी वायरमन रणजित व विद्युत अधिकारी नागेश देवलतकर यांच्याशी संपर्क साधून घटनेबाबत कळवले.

वायरमन रणजित यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून वीजपुरवठा बंद केला. प्रा. शंकर गावडा यांनी झाडाच्या अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्या हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर व शाळेजवळ कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना गावातील प्रमुख रस्त्यावर घडल्यामुळे ग्रामस्थांत खळबळ उडाली आहे.

या भागात गेल्या वर्षीही अशीच एक घटना घडली होती. त्यामुळे शाळेच्या आजूबाजूची धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी पालकांनी व्यक्त केली आहे. तसेच, हेस्कॉमने गावाचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा, अशी मागणीही प्रा. शंकर गावडा यांनी केली.
या वेळी महादेव गावडा, जीवाप्पा मयेकर, पुंडलिक सुतार, शावेर परेरा आदी उपस्थित होते.