गर्लगुंजी: परिसरात कुक्कुट पालन केंद्रांची संख्या वाढत असताना गावठी कुत्र्यांची संख्या देखील वाढली आहे. अशाच कुत्र्यांच्या कळपाने कुक्कुटपालन केंद्रावर हल्ला करत सुमारे दीडशे कोंबड्यांचा फडशा पाडला आहे.
गर्लगुंजी – इदलहोंड मार्गावर मंगळवारी ही घटना घडली. त्यामुळे कुक्कुटपालन केंद्राचे मालक सिद्राम भातखांडे यांना ५० हजार रुपयांचा फटका बसला आहे. कुक्कुटपालन केंद्र ५०० कोंबड्या क्षमतेचे आहे. सोमवारी सायंकाळी साडेतीनशे कोंबड्यांची विक्री मालकाने केली होती. उर्वरित 150 कोंबड्या केंद्रात होत्या. मंगळवारी नेहमीप्रमाणे कोंबड्यांना दाणे घालून ते घराकडे गेले होते. परत केंद्राकडे आले असता गावठी कुत्र्यांचा एक कळप कुक्कुटपालन केंद्रात घुसून कोंबड्यांचा पडशा पाडत असल्याचे चित्र त्यांच्या नजरेला पडले. त्यांनी लागलीच ही माहिती आजूबाजूच्या शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना दिली. घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांनी कुत्र्यांना हुसकावून दिले. मात्र, केवळ तीनच कोंबड्या बचावल्या. उर्वरित सुमारे दीडशे कोंबड्या ठार झाल्या होत्या.
घटनेची माहिती गावातील पशूवैद्यांना देण्यात आली. डॉ. गंगाधर बाळीगट्टी व डॉ. गंगाराम गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
कुत्री केंद्रात शिरली कशी?
कुत्र्यापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक कुक्कुटपालन केंद्रात खबरदारी घेण्यात आली आहे. तरीदेखील गावठी कुत्र्यांनी कुक्कुटपालन केंद्रात शिरून कोंबड्यांचा फडशा पाडला. सगळीकडे जाळी मारून बंदोबस्त केला असता कुत्री शिरली कशी, असा प्रश्न आहे.