विद्यार्थ्यांच्या तक्रारींमुळे खानापूर कॉलेजच्या लेक्चररवर चौकशीचा फेरा
खानापूर: येथील गव्हर्नमेंट फस्ट ग्रेड कॉलेजमध्ये मॅनेजमेंट डिपार्टमेंटमध्ये शिकवणाऱ्या अतिथी लेक्चरर डॉ. रेश्मा योगानंद यांच्यावर विद्यार्थ्यांकडून अनेक तक्रारी आल्याने महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अध्यापनावर प्रश्नचिन्ह लावल्याने आता त्यांची चौकशी करावी असे पत्रक शिक्षण विभाग धारवाड तसेच आमदार विठ्ठलराव हलगेकर यांना दिले आहे.
या पत्रात लिहिल्याप्रमाणे, सुरुवातीला त्यांच्या वर्गात शिकणाऱ्या बीबीए विद्यार्थ्यांकडून थोड्या तक्रारी येऊ लागल्या, पण हळूहळू त्या वाढत गेल्या. चौथ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना लेखी तक्रार दिली, ज्यामध्ये अपूर्ण अध्यापन आणि वागणुकीवरही नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नाही, तर अन्य अतिथी व्याख्याते(लेक्चरवर) आणि कर्मचाऱ्यानी देखील त्यांच्याविरोधात नाराज असल्याचं समोर आलं.
या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, 5 जुलै 2024 रोजी प्राचार्यांनी सर्व शिक्षकांची एक बैठक बोलावली. या बैठकीत, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य किती महत्त्वाचे आहे हे सांगण्यात आले. तसेच, भविष्यात असे काही घडल्यास उच्च अधिकाऱ्यांना कळवले जाईल, असे सर्वांना स्पष्ट करण्यात आले.
ही परिस्थिती हाताळण्यासाठी इतर प्राध्यापकांनी उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण केला. विभाग प्रमुख यांनीही प्राचार्यांकडे लेखी तक्रार दिली आहे. महाविद्यालयाने यासंबंधी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हे पाऊल उचलले आहे. या प्रकरणाची दखल आमदारांनी देखील घ्यावी अशी मागणी आज विद्यार्थ्यांनी केली.