पिरनवाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीच्या आगमन सोहळ्याची जय्यत तयारी
बेळगाव: बेळगाव–खानापूर मुख्य रस्त्यालगत असलेल्या पिरनवाडी क्रॉस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ मूर्तीच्या आगमन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. बेळगाव शहरातून खानापूरकडे येताना या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे दर्शन प्रत्येक वेळी दर्शन खानापूर वासियांना होणार आहे.
पिरनवाडी येथील छत्रपती शिवस्मारक जीर्णोद्धार सेवा संघ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अश्वारूढ मूर्ती उभारण्यात येत आहे. शिवरायांच्या मूर्तीचा आगमन सोहळा रविवार दि. 22 रोजी आयोजित करण्यात आला असून, या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांच्या गडकिल्ल्यांची प्रचिती देणारे दगडी स्वरूपातील भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकासमोर दगडामध्ये स्तंभ बांधण्यात येत असून, त्या स्तंभामध्ये अखंड ज्योत तेवत ठेवण्यात येणार आहे. स्मारकाभोवती संरक्षक भिंत बांधण्यात आली असून, परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करून चौकाची शोभा वाढविण्यात आली आहे. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान होणार आहे, त्या जागेची विशेष सजावट करण्यात येत आहे.
या भव्य सोहळ्यासाठी छत्रपती शिवस्मारक जीर्णोद्धार सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत. रविवारी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक गोवावेस, अनगोळ नाका, रेल्वे ओव्हरब्रिज, उद्यमबाग मार्गे पिरनवाडी येथे दाखल होणार आहे.
मिरवणुकीत सोलापूर येथील स्वराज्य मर्दानी खेळ पथक, पेद्रेवाडी येथील जय भवानी महिला लेझीम पथक, किणये येथील वारकरी महिला भजनी मंडळ, मच्छे येथील चक्रपाणी युद्धकला प्रशिक्षण केंद्र, इस्कॉन भजन मंडळ, तसेच ढोल-ताशा आणि ध्वजपथक बेळगाव यांचा सहभाग राहणार आहे. या सोहळ्यामुळे पिरनवाडी व परिसरात उत्साहाचे आणि शिवमय वातावरण निर्माण झाले आहे.
