सन्नहोसूर व भंडरगाळी गावची श्री महालक्ष्मी यात्रा 12 फेब्रुवारी 2025 पासून
खानापूर: तालुक्यातील सन्नहोसूर आणि भंडरगाळी या गावांमध्ये 12 फेब्रुवारी 2025 रोजी श्री महालक्ष्मी यात्रेचे आयोजन होणार आहे. यात्रेची तयारी 18 ऑक्टोबर 2024 रोजी, देवीला गाऱ्हाणा घालण्याच्या सोहळ्याने सुरू झाली. या कार्यक्रमात दोन्ही गावांतील पंच कमिट्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आगामी 5 दिवसांमध्ये देवीचे पारंपरिक वार पाळले जातील, आणि मंगळवारी पंच कमिटीच्या वतीने देवीची ओठी भरण्यात येईल. त्यानंतर देवीच्या मूर्तीवर रंगकाम होणार असून, यात्रेच्या पूर्वसंध्येला देवीचा गोंधळ घातला जाणार आहे.
यात्रेचा मुख्य दिवस 12 फेब्रुवारी असेल, ज्यादिवशी सकाळी 7.10 वाजता देवीच्या अक्षता होऊन यात्रेची विधिवत सुरुवात होईल. या यात्रेचा 9 दिवसांचा कालावधी असून, दररोज रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
18 ऑक्टोबरला झालेल्या गाऱ्हाणा सोहळ्यात यात्रा समितीचे पदाधिकारी गावकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. ग्रामस्थांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी एकमेकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि देवीकडे मांगल्याची प्रार्थना केली.