बेळगावात पार्किंगवरून वाद गोव्यातील व्यक्तीस मारहाण
बेळगांव: शहरातील खडेबाजार परिसरात पार्किंगच्या वादातून गोव्यात वास्तव्यास असलेल्या, पण मूळ बेळगावच्या रहिवासी असलेल्या मंदार मांजरेकर (वय ५६) यांच्यावर हल्ला झाल्याची घटना शनिवारी (दि. २ ऑगस्ट) दुपारी घडली. या हल्ल्यात त्यांना डोक्याला दुखापत झाली असून खडेबाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मांजरेकर हे सध्या गोव्यात वास्तव्यास आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी ते आपल्या आजारी वृद्ध आईला भेटण्यासाठी बेळगावात आले होते. ते रिसालदार गल्ली येथील आपल्या भाड्याच्या निवासस्थानी काही वेळासाठी थांबले होते. यादरम्यान, त्यांनी आपल्या घरासमोर पार्क केलेली दुचाकी हटवत असताना शेजारी राहणाऱ्या स्थानिक दाम्पत्याशी त्यांचा वाद झाला.
वादाचे रूपांतर शाब्दिक बाचाबाचीत झाले आणि त्यानंतर संबंधित दाम्पत्याने मांजरेकर यांच्यावर अचानक हल्ला केला. मारहाणीदरम्यान मांजरेकर घसरून पडले व त्यांना डोक्याला दुखापत झाली. घटनेवेळी उपस्थित असलेल्या काही स्थानिक नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील अनर्थ टळवला.
या घटनेनंतर मांजरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “मी कॅम्प परिसरातील आर्मी इन्स्टिट्यूटमध्ये गेलेलो होतो आणि त्यानंतर आईला भेटण्यासाठी घरी आलो होतो. गोव्यात सध्या कर्नाटक नोंदणीच्या वाहनांवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत असताना, आता कर्नाटकातही गोवा नोंदणीच्या वाहनांना लक्ष्य केले जात आहे. ही गंभीर बाब असून दोन्ही राज्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेण्याची गरज आहे.”
या प्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाला असून पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की, “संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.”
ai Image