बेळगाव: अपार्टमेंटच्या पार्किंगमधून कार बाहेर काढत असताना सुरक्षा रक्षकाला धडक बसून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगावात घडली आहे. हा अपघात रविवारी सकाळी न्यु गुड्सशेड रोड परिसरात झाला असून या प्रकरणी वाहतूक दक्षिण विभागाने पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद केली आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव नागेश शट्टप्पा देवजी (वय ५६) असे आहे. नागेश हे राहुनगर माळी गल्ली येथील रहिवासी होते. रविवारी, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
कारची धडक बसल्याने नागेश गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेची माहिती मिळताच वाहतूक दक्षिण विभागाचे पोलिस निरीक्षक बसगोंडा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी, कार चालवणाऱ्या महिलेविरोधात वाहतूक पूर्व पोलिसांनी एफआयआर (FIR) दाखल केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मृत नागेश देवजी यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कॅम्पमधील राजगुरु गल्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.