आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटात ही बाळ, बेळगांव मध्ये काय घडलं?
बेळगांव: चंदगड येथील एका महिलेला मुलीला जन्म दिला, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बाळाच्या पोटात तिचाच जुळा भ्रूण वाढत असल्याचे आढळले. हे अतिशय दुर्मिळ प्रकरण असून, असे केवळ 5-6 लाख प्रसूतींपैकी एका वेळेसच घडते.
गर्भधारणेच्या 28व्या आठवड्यात गडहिंग्लज येथील डॉ. संजय शानबाग यांनी अल्ट्रासोनोग्राफी केली असता बाळाच्या पोटात गाठ असल्याचे दिसले. मात्र, पुढील तपासणीत समजले की ती गाठ नसून दुसरा भ्रूण आहे. बाळाचा 37व्या आठवड्यात जन्म झाला आणि पुढील उपचारांसाठी त्याला बेळगाव येथील केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात हलवण्यात आले.

बाळाच्या जन्मानंतर तिसऱ्या दिवशी बालशल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील पाटणशेट्टी व सहायक डॉ. सक्षम यांनी शस्त्रक्रिया करून बाळाच्या पोटातील हा जुळा भ्रूण काढून टाकला. हा भ्रूण बाळाच्या मोठ्या रक्तवाहिन्यांजवळ होता, त्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पडली. भूलतज्ज्ञ डॉ. राजेश माने आणि डॉ. प्रियांका गाडवी यांनी बाळाला सुरक्षित भूल देऊन शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर बाळाला एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले आणि डॉ. मनीषा भांडणकर व डॉ. राम भट यांनी त्याची देखरेख केली. सध्या बाळाची प्रकृती चांगली असून, ते लवकरच पूर्ण बरे होईल.
“फेटस-इन-फेटू” हे प्रकरण का घडते हे नक्की माहित नाही. मात्र, असे मानले जाते की गर्भधारणेच्या सुरुवातीच्या आठवड्यात जुळ्या भ्रूणांपैकी एक भ्रूण दुसऱ्याभोवती गुंडाळला जातो आणि त्याच्या शरीरात वाढू लागतो. त्यामुळे हा आतला भ्रूण “परजीवी भ्रूण” बनतो आणि दुसऱ्या भ्रूणाच्या रक्तपुरवठ्यावर अवलंबून राहतो.
केएलई सोसायटीचे अध्यक्ष, संचालक आणि केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल अँड एमआरसी, बेळगावच्या वैद्यकीय संचालकांनी या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण डॉक्टर टीमचे अभिनंदन केले.
A woman from Chandgad gave birth to a baby girl with a rare medical condition called “Fetus-in-Fetu,” where a twin fetus was found growing inside the baby’s abdomen. The rare case was detected during an ultrasound, and the baby underwent successful surgery at KLE Dr. Prabhakar Kore Hospital, Belgaum. Doctors successfully removed the parasitic twin, and the baby is now recovering well.


