15 लाख अपुरे – पर्यायी गाव द्या, आमगाव ग्रामस्थांचे स्थलांतर मागणीसाठी आंदोलन
सरकारने ‘जागेच्या बदल्यात जागा’ या तत्वावर त्यांना पर्यायी ग्रामस्थळ उपलब्ध करून स्थलांतर देण्याची मागणी
खानापूर : भिमगड अभयारण्यात वसलेल्या आमगाव गावातील ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून पुनर्वसनाची मागणी केली. सुमारे २३० कुटुंबांचे आमगाव हे गाव अभयारण्याच्या हद्दीत येत असल्याने येथील ग्रामस्थांचे स्थलांतर होणे अपेक्षित आहे. मात्र अद्याप योग्य जागा व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याने ग्रामस्थांनी याबाबत लेखी निवेदन दिले.
ग्रामस्थांचे म्हणणे असे की, सध्या त्यांना सरकारतर्फे प्रती कुटुंब १५ लाख रुपये भरपाईची तरतूद आहे. परंतु या रकमेवर गावातील ७४ ते ७५ कुटुंबे, अंदाजे ५८० लोकांना पुनर्वसन करणे शक्य नाही. गावाकडे मिळून सुमारे ९० ते ९५ एकर जमीन आहे. त्यामुळे सरकारने ‘जागेच्या बदल्यात जागा’ या तत्वावर त्यांना पर्यायी ग्रामस्थळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
गावकऱ्यांनी सांगितले की, आमगाव गावात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. रस्ता नसल्याने सात किलोमीटर पायी चालून जावे लागते. आरोग्य सुविधा, शाळा, वीजपुरवठा यांचा अभाव आहे. मुलांचे शिक्षण, आरोग्य व भविष्यासाठी सुरक्षित पर्यायी गावाची स्थापना करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामस्थांची भेट झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना जागेची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याआधारे स्थानिक आमदार, जनप्रतिनिधी, अरण्य विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी तळेवाडी गावाचे पुनर्वसन ‘स्वेच्छेने स्थलांतर’ योजनेअंतर्गत यशस्वीरीत्या करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर सर्वांशी चर्चा करून आमगाव गावाचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.
आंदोलनावेळी बाबू तळवार, एकनाथ गावडे, राजळगोडी, संतोष गोडी, सुरेश दलवाई यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

