आमगाव विकासकामां पासून कोसो दूर,आता संपूर्ण गावच्या स्थलांतराची मागणी
खानापूर – बेघर झालेला नटसम्राट आपल्या पत्नीसह जीवन जगण्यासाठी घराच्या निवाऱ्यासाठी कुणी घर देता का घर अशी याचना करताना दिसतो. त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या आमगावातील नागरिक जीवन माणसाप्रमाणे जगता यावे यासाठी सरकार कडून अपेक्षेत आहेत.शासन-प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे अपेक्षा ठेवून असलेल्या आमगाववासियांना जगणे असह्य झाले आहे.दोन वर्षांपूर्वी एका महिलेला उपचारासाठी धो धो पावसात चार किलोमीटर तिरडी वरून नदी पर्यंत नेण्याची वेळ दुर्दैवी वेळ आली. या घटनेची जोरदार चर्चा झाल्यानंतर प्रशासनही सतर्क झाले.जिल्हाधिकाऱ्यांनी आमगावातील समस्यांसंदर्भात बैठक बोलावली होती बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली मात्र चर्चेतील मुद्दे कागदावरच राहिले. आता पुन्हा एकदा आमगावयांनी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन स्थलांतराची मागणी केली आहे.

देशात डिजिटल इंडियाचे नगारे वाजविले जात असताना बेळगाव जिल्ह्यातील, खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेले आमगाव विकासकामां पासून कोसो दूर राहिले आहे. साडेपाचशे लोकसंख्या असलेल्या या गावाला जाण्यासाठी तब्बल साडेसहा किलोमीटर खाचखळग्यांनी भरलेला रस्त्यातून गावकऱ्यांना पायपीट करावी लागते.कर्नाटक राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस आमगावात झाल्याची नोंद झाली आहे. मात्र याच गावाला उन्हाळ्याच्या दिवसात दोन महिने पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना भटकंती करावी लागते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजेच्या तारा कोसळतात, त्यामुळे नेहमीच विजेचा लपंडाव आणि त्यातच पावसाळ्यात महिनाभर या भागाला वीज पुरवठा होत नाही. 1983 साली आमगाववासियांना स्थलांतर होण्यासाठी नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.आमगाववासियांना आमटे गावां नजीक जागा देण्यात येणार आहे.आमगाववासीयांनी आतापर्यंत स्थलांतराकडे दुर्लक्ष केले आहे.
गावात प्राथमिक शाळा असली तरीही माध्यमिक शाळेसाठी गावातील विद्यार्थ्यांना खानापुर अथवा लोंढा येथे जाऊन वसतिगृहात राहून शिक्षण घ्यावे लागते. या गावाच्या दरम्यान असलेल्या बैल नदीवर बंधारा कम ब्रिज बांधण्याचा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे. रस्ताच नसल्यामुळे या गावाकडे कोणतेच वाहन येत नाही. त्यामुळे या गावाला रुग्णवाहिका कधी पोहोचलीच नाही. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. गावकऱ्यांना सातेरी माउली वर विश्वास ठेवून आपल्या आरोग्याची काळजी करावी लागते.
एका बाजूला देशात स्मार्ट सिटीच्या योजना सुरू असताना दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील जनतेला वीज,रस्ता, पिण्याच्या पाण्यासाठीही वंचित राहावे लागत आहे,हीच खरी वस्तुस्थिती आहे, मात्र याचे गांभीर्य शासन, आणि प्रशासनाला दिसत नाही. मतांच्या राजकारणावर डोळा ठेवून कामे करणाऱ्या लोकप्रतिनिधींना ही अशा दुर्गम भागातील जनतेच्या समस्यांची दखल घेण्याची गरज वाटत नाही. या गावाला खासदारांनी कधी पाय लावला नाही. या भागातील आमदारांनी केवळ आश्वासन देत गावकऱ्यांची आत्तापर्यंत बोळवण केली आहे.त्यामुळे आम्ही जगायचे कसे हाच प्रश्न आमगाववासियांना भेडसावत आहे.
गावाला रस्ते व पूल अशा मूलभूत सुविधाही नाहीत. पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटून वाहतूक पूर्णपणे बंद होते. याकाळात जीवनावश्यक वस्तूंसह इतर साहित्याचीही जुळवाजुळव करताना तारेवरची कसरत कारावी लागते. तसेच गावाचा संपर्क तुटल्याने वैद्यकीय सेवा मिळणेही कठीण होते. अंगणवाडी व शाळा जवळ नसल्याने मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी गावातील 99, 101, 102, 103 सर्व्हे क्रमांकावरील गावठाण जागेत नवे गाव निर्माण करून गावात असणाऱ्या 230 ते 250 कुटुंबीयांचे त्या जागेत स्थलांतर करावे. तसेच सदर ठिकाणी मूलभूत सुविधाही देण्यात याव्यात. तसेच सरकारकडून वसती सुविधाही देण्यात यावी. आधारकार्ड, रेशनकार्ड, शिक्षण सुविधा पुरवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आता करण्यात आली आहे.
आमगाववासीयांच्या व्यथा वेदनांची जाणीव ठेवून शासन,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी त्या गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
credit: श्रीकांत काकतीकर