अनमोड घाटात भीषण अपघात – दूध सागर मंदिराजवळ ट्रकची कारला धडक
अनमोड: अनमोड घाटातील दूध सागर मंदिराजवळ आज सकाळी एक भीषण अपघात घडला. कर्नाटकातून गोव्याच्या दिशेने सिमेंट घेऊन जाणाऱ्या 12 चाकी ट्रकने वॅगनआर कारला जोरदार धडक दिली.
ही कार मडगावहून बेळगावकडे जाणाऱ्या चार प्रवाशांची होती. मंदिराजवळ पाया पडण्यासाठी प्रवासी गाडीतून उतरण्याच्या तयारीत असतानाच ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली.
अपघात एवढा भीषण होता की धडकेनंतर ट्रक मंदिरासमोरील ख्रिश्चन धर्मीयांच्या श्रद्धास्थानाजवळील क्रॉसला धडकला आणि पुढे झाडाला अडकून थांबला.
या धडकेत कारमधील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर ट्रकचालक ट्रकमध्ये अडकून पडला होता. अग्निशामक दलाने घटनास्थळी तत्काळ धाव घेत त्याला बाहेर काढले. प्रथम उपचारासाठी त्याला तिस्क येथील उजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आणि नंतर बांबोली येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघाताची नोंद कुळे पोलीस स्थानकात झाली असून पुढील तपास सुरू आहे.