गणेबैल टोल प्रकरण : टोल कंपनी टर्मिनेट; नवीन टेंडर लवकरच

खानापूर : गणेबैल टोल प्रकरणी आज बेळगाव येथील एसी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला एसी श्रवण नाईक, NHAI चे प्रोजेक्ट डायरेक्टर भुवनेश कुमार शुक्ला, काँग्रेसचे नेते प्रसाद पाटील, टोल कर्मचाऱ्यांचे वकील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

परवाच जिल्हाधिकारी (डीसी) आणि पोलीस अधीक्षक (एसपी) यांची भेट घेऊन टोल कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती. त्यानंतर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. टोल चालवणाऱ्या हुळे कंपनीला तोडगा काढून टोल पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. दोन्ही बाजूंनी समन्वय साधून पुढे जाण्याचा सल्लाही देण्यात आला. मात्र, संबंधित कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर टोल चालवणारी कंपनी टर्मिनेट करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती प्रसाद पाटील यांनी दिली.
दरम्यान, NHAI च्या अधिकाऱ्यांनी लवकरच नवीन टेंडर काढून नवीन कंपनीला टोल संचालन देण्यात येईल, असे सांगितले. तोपर्यंत टोल प्रणाली ‘ऑटो मोड’वर चालवली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
तसेच, नवीन टोल कंपनी आल्यानंतर स्थानिक (भूमिपुत्र) टोल कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे.
यावेळी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसने टोल कर्मचाऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा पुनरुच्चार केला. तालुक्यात कुणावरही अन्याय झाल्यास त्याविरोधात लढा सुरूच राहील, असेही स्पष्ट करण्यात आले.
या प्रश्नावर भाजप नेते व समितीने मौन बाळगून असल्याची टीका करण्यात येत आहे. सुमारे 40 युवक-युवतींच्या नोकऱ्या धोक्यात असतानाही त्यांनी भूमिका न मांडल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
