खानापूर: तालुक्यातील कुपटगिरी गावचा सुपुत्र आणि लिंगराज महाविद्यालयाचा विद्यार्थी भूषण सुनील पाटील याने ओडिशामधील भुवनेश्वर येथे झालेल्या 40 व्या राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटिक चॅम्पियन स्पर्धेत रौप्य पदक पटकावून खानापूरचे नाव उंचावले आहे. हे त्याचे सातवे राष्ट्रीय पदक आहे.

भुवनेश्वर येथील स्पर्धेत 400 मीटर हर्डल्स शर्यतीत भूषणने कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व केले आणि 52.07 सेकंदात शर्यत पूर्ण करत हे शानदार रौप्य पदक जिंकले.
भूषण पाटील याला प्रशिक्षक ज्ञानेश डुक्करवाडकर, अमर डुक्करवाडकर आणि लिंगराज महाविद्यालयाचे क्रीडा निर्देशक डॉ. रामराव सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले आहे. तसेच, निवृत्त सुभेदार सुनील पाटील आणि सुनीता पाटील यांचे त्याला नेहमीच प्रोत्साहन मिळत असते.
कुपटगिरी गावच्या या होतकरू खेळाडूने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशामुळे संपूर्ण खानापूर तालुका आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये त्याचे प्रचंड कौतुक होत आहे. त्याचे पुढील वाटचालीस शुभेच्छा!
