कुळाच्या वादातून दिराने केला भावजयेचा फावड्याने खून
रामनगर प्रतिनिधी) :
जोयडा तालुक्यातील शिंगरगाव ग्रामपंचायत हद्दीतील मालंबा गवळीवाडा येथे गुरुवारी सकाळी झालेल्या धक्कादायक घटनेत दिराने भावजेचा कुळाच्या वादातून खून केला.
धोंडू गंगाराम वरक (वय 55) या इसमाने आपल्या भावजय भाग्यश्री सोनू वरक (वय 32) हिला घरासमोरच डोक्यात फावड्याने मारहाण करून ठार केले. घरातील कुळाच्या हक्कावरून गेल्या काही वर्षांपासून धोंडू वरक व सोनू वरक यांच्या कुटुंबांत वाद सुरू होता. यापूर्वी ग्रामसभेत बैठक घेऊन समजूत काढण्यात आली होती. मात्र धोंडूच्या मनात “आपल्याकडे कुळ नसल्यामुळे घरात सतत आरोग्य समस्या उद्भवत आहेत” असा गैरसमज घर करून बसला होता. यामुळेच रागाच्या भरात त्याने गुरुवारी भावजेला जीवघेणा हल्ला केला.
या हल्ल्यात भाग्यश्रीचा जागीच मृत्यू झाला. तीचा नवरा गोव्यात नोकरीस असून, चार मुलांसह तेथेच वास्तव्यास होता.
घटनेची माहिती मिळताच कारवार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दीपण एम. एन., दांडेली उपविभागीय पोलीस अधिकारी शिवानंद मदरकट्टी, जोयडा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर हरिहर, रामनगर पोलीस ठाण्याचे पीएसआय महंतेश नायक व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रामनगर सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी धोंडू वरक फरार असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.