जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडून जातीय सलोख्याचा आदर्श
बेळगांव – सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण देत, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश चतुर्थीनिमित्त आपल्या प्रशासकीय बंगल्यात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. एक मुस्लिम अधिकारी स्वतःहून बाप्पाला घेऊन येऊन त्याची स्थापना करतो, ही बाब कौतुकास्पद ठरली आहे.
आज सकाळी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन सहकुटुंब मिरवणुकीत सामील झाले. राणी कित्तूर चन्नम्मा चौकातील गणेश मंदिरापासून पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात त्यांनी गणपती बाप्पाची मूर्ती आणली. या वेळी, ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेली मूर्ती या वर्षीही पर्यावरणपूरक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः आपल्या चिरंजीवासह मंदिरातील गणपतीची पूजा करून बाप्पाचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर, त्यांनी मिरवणुकीने गणपती घेऊन काही अंतर पायी प्रवास केला. त्यांच्या या कृतीमुळे सर्वसामान्यांमध्ये एकतेचा आणि सलोख्याचा संदेश पोहोचला आहे.