गुंजी : गेल्या दोन दिवसांपासून गुंजी परिसरातील भालके (के.एच.) आणि शिंपेवाडी भागात हत्तीचे आगमन झाले असून त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

आठ दिवसांपूर्वी नागरगाळी जंगलातून आलेला हा हत्ती घोसे जंगलात विसावला होता. मात्र आता तो कामतगा जंगलातून भालके आणि शिंपेवाडी परिसरापर्यंत पोहोचला आहे. अद्याप पर्यंत या हत्तीने कोणतेही नुकसान केलेले नसले, तरी त्याच्या उपस्थितीमुळे शेतकऱ्यांत धास्तीचे वातावरण आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी शेत राखणीस जाणे टाळले असून, इतर जंगली प्राण्यांपासून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने त्वरित कारवाई करून या हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
