निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर काँग्रेसचा हल्लाबोल: ‘वोट चोरी’च्या आरोपावरून गंभीर प्रश्नचिन्ह
खानापूर (बेळगाव): केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission of India – ECI) ‘वोट चोरी’च्या आरोपांवरून माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसने भाजप आणि निवडणूक आयोगाच्या संबंधांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC) सचिव आणि माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी आज खानापूर ते नंदगड दरम्यान काढलेल्या ‘व्होटर अधिकार यात्रे’दरम्यान भाजप निवडणूक आयोगाच्या वतीने का उत्तरे देत आहे, असा सवाल करत “निवडणूक आयोग विकला गेला आहे की काय?” असा घणाघात केला.

नंदगड येथील मार्केटिंग सोसायटीच्या सभागृहात झालेल्या सभेत बोलताना डॉ. निंबाळकर म्हणाल्या की, केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे ‘वोट चोरी’संदर्भात माहिती मागवली आहे. मात्र, आयोग ती देण्यास टाळाटाळ करत आहे. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट करण्याऐवजी भाजप नेते उत्तरे देत आहेत. निवडणूक आयोग एक स्वतंत्र यंत्रणा असूनही भाजपच्या या हस्तक्षेपामुळे आयोग आणि भाजपमध्ये ‘अभद्र युती’ आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्या म्हणाल्या. “आयोग लोकशाहीचा आदर करत नाही का?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोगाकडून प्रतिसाद नाही
डॉ. अंजली निंबाळकर यांनी जोर दिला की, राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी आयोगाची माहिती उघड केली आहे, तरीही निवडणूक आयोग कोणतीही माहिती देण्यास पुढे येत नाहीये. लोकशाही मार्गाने ही माहिती दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली. खानापूरमध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी आम्ही जोमाने काम करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. तसेच, ‘बेळगांवाल्यांच्या नादाला लागून तालुक्यात भलते-सलते उद्योग करू नये,’ असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.
केंद्रातील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘व्होटर अधिकार’ हा मुद्दा घेऊन बिहारमधून या यात्रेला सुरुवात केली आहे, आणि आता ही यात्रा खानापूरमध्येही काढण्यात आली. याप्रसंगी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी, महांतेश राऊत, लक्ष्मी मादार, मल्लिकार्जुन वाली यांचीही भाषणे झाली. या यात्रेदरम्यान खड्यांमध्ये झाडे लावून तालुका प्रशासनाचा निषेधही व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात:
या यात्रेची सुरुवात खानापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आली. नंदगडमध्ये पोहोचल्यानंतर डॉ. निंबाळकर यांनी क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मार्केटिंग सोसायटीच्या हॉलमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते.