खानापूर – खानापूर–बेळगाव मार्गावरील खानापूर नगर पंचायत हद्दीतील काही भागांमध्ये रस्त्याच्या मध्यभागी लावलेले स्ट्रीटलाईट्स कार्यरत नसल्यामुळे संपूर्ण परिसर गडद अंधारात बुडाला आहे.

या दाट अंधारामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना रस्त्यावरून प्रवास करताना अडथळे निर्माण होत आहेत. आधीच रस्त्यावर खड्डे असताना त्यातच प्रकाशाचा अभाव असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काही लाईट्सचे वीज कनेक्शन कट झाले असून, संपूर्ण परिसर अंधारात आहे. फक्त काही मोजक्या दिव्यांमध्येच प्रकाश दिसत असून उर्वरित भागात सगळीकडे अंधार पसरलेला आहे.
या पार्श्वभूमीवर नगर पंचायतने त्वरित लक्ष घालून बंद दिवे पुन्हा कार्यान्वित करावेत तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी, अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.