लोंढा | गुरुवारी दुपारी फोंडा-बेतोडा परिसरात झालेल्या एका भीषण स्कूटर अपघातात लोंढा-पिंपळे येथील युवक आदित्य देसाई (वय अंदाजे २२, सध्या राहणार बेतोडा) याचा मृत्यू झाला आहे. तो त्याचा मित्र योगेश पाटील (म्हाळशी – कुर्टी) याच्यासोबत स्कूटरवरून वेगात जात असताना, विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात ईशा गावस (केरी – सत्तरी) हिचा देखील जागीच मृत्यू झाला, तर आदिती मांजरेकर (पर्ये – सत्तरी) आणि योगेश पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात इतका भीषण होता की दोन्ही स्कूटर पूर्णपणे चक्काचूर झाल्या. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्वांना फोंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीअंती आदित्य व ईशा यांना मृत घोषित केले, तर इतर दोघांना पुढील उपचारासाठी गोमेकोत हलवण्यात आले. त्यापैकी योगेश पाटील याची प्रकृती चिंताजनक आहे.
लोंढा व पिंपळे परिसरात आदित्यच्या अकस्मात निधनाने हळहळ व्यक्त केली जात असून, त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.