लोंढा: रविवारी (२५ मे २०२५) पहाटे सुमारे २.३० वाजता वास्को-द-गामा ते यशवंतपूर जाणाऱ्या एक्सप्रेस गाडीचा (क्रमांक 17310) एक डबा कॅरनझोल आणि कॅसल रॉक दरम्यान रुळावरून घसरला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा प्रवाशांना दुखापत झाली नाही, अशी माहिती दक्षिण पश्चिम रेल्वेने दिली आहे.
मात्र, या घटनेचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला असून काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. वास्को-द-गामा ते शालीमार जाणारी ट्रेन (क्रमांक 18048), जी सकाळी ६.३० वाजता सुटणार होती, ती आता दोन तास उशीराने ८.३० वाजता सुटेल.
हजरत निजामुद्दीन ते वास्को-द-गामा ही ट्रेन (क्रमांक 12780) सध्या लोंडा स्टेशनवर थांबलेली आहे. लोंडा येथे सुमारे १,००० प्रवाशांसाठी नाश्ता, चहा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अपघातग्रस्त डबा हटवण्यासाठी वास्को-द-गामा येथून विशेष ट्रेन घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. रुळ दुरुस्त करण्याचे काम वेगाने सुरू असून, आणखी कोणतेही बदल झाल्यास प्रवाशांना त्वरित माहिती देण्यात येईल.