गुंजी ग्रामपंचायत पोटनिवडणूक : दोन्ही जागा बिनविरोध!
खानापूर: गुंजी ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत दोन्ही रिक्त जागांवर निवडणूक बिनविरोध ठरली आहे. वॉर्ड क्रमांक 1 (सामान्य महिला) साठी आणि भालका बीके/केएच वॉर्ड क्रमांक ७ साठी प्रत्येकी फक्त एकच अर्ज शिल्लक राहिल्यामुळे, या दोन्ही जागांवर प्रत्यक्ष मतदानाची गरजच उरली नाही.
निवडणुकीची प्रक्रिया 14 मे, बुधवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीने पूर्ण झाली. त्यानंतर 17 मे, शनिवार हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या मुदतीत कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. परिणामी, प्रत्येक जागेकरिता एकेक अर्ज कायम राहिला.
वॉर्ड क्रमांक 1 साठी राजश्री रावजी बिरजे यांचा तर वॉर्ड क्रमांक 7 साठी श्रावणी संदीप शास्त्री यांचा अर्ज एकमेव ठरला. निवडणूक अधिकारी एम. एन. उत्तुरकर यांनी शनिवारी सायंकाळी दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर केली.
या घोषणेनंतर गुंजी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात दोन्ही निवडून आलेल्या प्रतिनिधींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गावकऱ्यांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या असून विकासात्मक कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.