खानापूर

‘हे पाणी नाही, पिढ्यांचं भवितव्य चोरणार!’ – दिलीप कामत यांचा इशारा

म्हादई नदी वळवण्याच्या प्रकल्पाला खानापूरकरांचा तीव्र विरोध!

खानापूर (प्रतिनिधी): म्हादई नदीचे पाणी उत्तर कर्नाटकात वळवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भांडुरा प्रकल्पाला खानापूर तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध होत आहे. भांडुरा प्रकल्पासाठी मणतूर्गा, करंबळ, नेरसा, रुमेवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आल्या असून, या नोटिसांच्या विरोधात लढा उभारण्याचा निर्णय लोकमान्य भवन येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

या प्रकल्पाअंतर्गत कर्नाटक सरकार कळसा आणि भांडुरा नाल्याचे पाणी मोठ्या पाईपद्वारे वळवून म्हादई नदीचे पाणी धरण बांधून वळवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी नेरसा परिसरात पाईप युनिट तयार करण्यात आले आहे. मात्र, हा संपूर्ण प्रकल्प पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात असून, त्यामुळे जंगलतोड, पर्यावरणीय विघटन आणि जैवविविधतेचे मोठे नुकसान होणार आहे.

बैठकीत पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कामत यांनी सांगितले की, “हे पाणी चोरण्याचे षड्यंत्र आहे. मलप्रभा नदीचा उगम खानापूर तालुक्यातच होतो. मात्र अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे पावसाचे प्रमाण घटले आहे आणि मलप्रभा नदी उन्हाळ्यात गटारासारखी वाहताना दिसते, ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.”

ते पुढे म्हणाले, “पूर्वी आम्ही ‘मलप्रभा वाचवा’ आणि ‘सह्याद्री वाचवा’ मोहिमा राबवल्या होत्या. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या गाडगीळ समितीने आणि नंतर कस्तुरीरंगन समितीने स्पष्टपणे नमूद केले की सह्याद्रीचं आरोग्य बिघडत आहे, आणि भविष्यात पाण्याचा तीव्र प्रश्न उद्भवेल. तरीही सरकार त्या अहवालांना धाब्यावर बसवून प्रकल्प रेटत आहे.”

या प्रकल्पामुळे खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन, पाणी आणि जंगल धोक्यात येणार आहे. त्यामुळे ‘जंगल वाचवा – पाणी वाचवा – खानापूर वाचवा’ अशा घोषणांसह मोहीम राबवण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रत्यक्ष भेटी घेऊन आपल्या विरोधाची भूमिका मांडावी, असे आवाहन करण्यात आले. “एका माणसाच्या किंवा एका उद्योगाच्या फायद्यासाठी संपूर्ण खानापूर तालुक्याचं नुकसान होऊ नये,” असे मतही यावेळी व्यक्त झाले.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या