खानापूर

गोदगेरी शाळेचा 112 वा शतकोत्तर सोहळा – माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा

खानापूर:  गोदगेरी गावातील प्राथमिक शाळेने आपल्या शैक्षणिक प्रवासाची 112 वर्षे पूर्ण केली असून, त्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी गावकरी, माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी तसेच पुणे, मुंबई, गोवा व बेळगाव येथे स्थायिक असलेले माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने, गावातील नागरिक, माजी विद्यार्थी आणि पंचकृषीतील शिक्षणप्रेमी एकत्र येणार आहेत.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  श्री. बी. जे. बेळगांवकर असणार आहेत. या कार्यक्रमासाठी  पालकमंत्री श्री. सतीश जारकीहोळी,
खासदार श्री. विश्वेश्वर हेगडे कागेरी , मंत्री सौ. लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार श्री. अरविंद पाटील, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासमवेत अनेक नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.

विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी  प्रमुख वक्ते म्हणून  श्री. शिवरामप्रसाद  पंडित, लोंढा – सुप्रसिद्ध मराठी व हिंदी विद्वान, मुंबई हे उपस्थित राहणार आहेत.

गोदगेरी शाळा 1913 मध्ये माननीय श्रीमंत शिवराम देसाई यांच्या प्रयत्नातून स्थापन झाली. त्या काळात बेळगाव आणि खानापूरमध्ये काही शाळा कार्यरत होत्या, मात्र गोदगेरी सारख्या ग्रामीण भागात शिक्षणासाठी अशी संस्था उभी राहणं ही एक क्रांतिकारी बाब होती. या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले असून, त्यांनी विविध क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे.

शाळेच्या स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट शिक्षणाची सोय केली गेली. आज, या शाळेने अनेक डॉक्टर, अभियंते, उद्योजक, सरकारी अधिकारी घडवले आहेत. याच स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

गावातील प्रतिष्ठित संस्था, माजी विद्यार्थी, तसेच आजूबाजूच्या गावातील शिक्षणप्रेमी या सोहळ्यात उत्साहाने सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक नागरिकाने तन-मन-धनाने सहकार्य करावे, अशी विनंती संयोजकांकडून करण्यात आली आहे.

माजी विद्यार्थ्यांच्या भावना या सोहळ्यात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. “या शाळेने आम्हाला घडवलं, आमचं भविष्य उज्ज्वल केलं. त्यामुळे आमची जबाबदारी आहे की, या शाळेच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही एकत्र येऊन प्रयत्न करावे,” असे मत अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.

हा सोहळा 17 मार्च 2025 रोजी गोदगेरी येथे मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जाणार आहे.  माजी विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक क्षणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे गावाच्या शिक्षणपरंपरेला अधिक बळकटी मिळनार आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते