निट्टूर क्रॉसजवळ हत्तीचे दर्शन, गावात भीतीचे वातावरण

खानापूर : तालुक्यात हत्तीचा वावर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शुक्रवारी (दि. 14) सकाळी एक हत्ती इदल होंड दरम्यान निट्टूर क्रॉसवर शाळकरी मुलांना दिसला त्यांनी तो व्हिडियो कॅमेऱ्यात टिपला. हा हत्ती निट्टूर क्रॉसपासुन अवघ्या 100 मिटर अंतरावर दिसला. यानंतर तो हत्ती बेळगाव-पणजी महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रस्त्या भुयारी पुलातून महामार्ग ओलांडून निट्टूरच्या हद्दीत प्रवेश करताना दिसून आला.
काही काळ तलावात डुबकी मारत जलक्रीडा केल्यानंतर तो पुढे गेला. या परिसरात मोठ्या प्रमाणात वीटभट्टी व्यवसाय चालत असल्याने येथे काम करणाऱ्या मजुरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
निट्टूर परिसरात हत्ती दाखल झाल्याची माहिती मिळताच खानापूरचे वनक्षेत्रपाल श्रीकांत पाटील यांनी यास दुजोरा दिला.
त्यांनी सांगितले की, “आमचे पथक हत्तीच्या मागावर असून रात्रीच्या वेळीही वन कर्मचारी गस्त घालणार आहेत. सर्वांनी हत्तीपासून सुरक्षित अंतर ठेवावे.”
हत्तीच्या वावरामुळे स्थानिक नागरिक आणि वीटउद्योगातील मजुरांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

