बेंगळुरू: येथील विधानसौध येथे अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सहायिका यांच्या मागण्या व अडचणींबाबत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बैठक घेतली. या वेळी त्यांनी मानधन वाढ, पदोन्नती, ग्रॅच्युइटी सुविधा, मोफत वैद्यकीय सेवा, आजारी कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
“मी नेहमीच अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या बाजूने आहे. आपल्या अंगणवाड्या संपूर्ण देशासाठी आदर्श आहेत. त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून पुढील अर्थसंकल्पात मानधन वाढीचा विचार केला जाईल,” असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. शम्ला इन्साल, विभागाचे संचालक एन. सिद्देश्वर, मंत्री यांच्या खाजगी सचिव डॉ. टी.एच. विश्वनाथ, विशेष अधिकारी बी.एच. निश्चल, एआयटीयूसीचे सचिव एम. जयम्मा, शिवशंकर, सीआयटीयू संघटनेच्या सुनंदा, एआययूटीयूसीच्या उमा, स्वातंत्र्य संघटनेच्या प्रेमा यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या अडचणींचा तातडीने विचार करून त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
