माचीगड-अनगडी येथे 29 डिसेंबरला साहित्य संमेलन: विचारांची अखंडित परंपरा
खानापूर: खानापूर तालुक्यातील सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या श्री सुब्रह्मण्य साहित्य अकादमीतर्फे येत्या २९ डिसेंबरला २८ वे वार्षिक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. माचीगड अनगडी येथील या अकादमीने १९९७ पासून अखंडितपणे साहित्य आणि विचारांची परंपरा पुढे नेण्याचे कार्य केले आहे. या साहित्य संमेलनाने आता स्थानिक मर्यादा ओलांडून खानापूर तालुक्यात रुजले आहे.
अकादमीचे कार्याध्यक्ष संजीव वाटुपकर व सचिव एम. पी. गिरी यांच्या नेतृत्वाखाली १९९७ मध्ये अकादमीची स्थापना करण्यात आली होती. सध्या अकादमीचे अध्यक्ष बाबूराव पाटील आहेत. संमेलनाची सुरुवात एकनाथ महाराज मंदिरापासून ग्रंथदिंडीने होते, आणि दरवर्षी प्रसिद्ध साहित्यिकांचे नाव साहित्यनगरीतील प्रवेशद्वार आणि व्यासपीठाला देण्यात येते. आतापर्यंत अनेक प्रतिष्ठित संमेलनाध्यक्षांनी या संमेलनाचे नेतृत्व केले असून, त्यांनी संमेलनाला वेगळीच उंची प्राप्त करून दिली आहे.
या संमेलनात नारायण अतिवाडकर, प्रा. आप्पासाहेब खोत, डॉ. राजन गवस, गीतकार जगदीश खेबुडकर, सिंधुताई सपकाळ, डॉ. ब. भा. बोधे, डॉ. बाबूराव गुरव, रवींद्र भट, विश्वनाथ शिंदे, डॉ. इंद्रजित भालेराव, उत्तम कांबळे, डॉ. अरुणा ढेरे, विष्णू सूर्या वाघ, प्रा. विठ्ठल वाघ, प्रा. यशवंत पाटणे, प्रतिमा परदेशी, डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. राजेंद्र कुंभार, डॉ. हरी नरके यांसारख्या नामवंत साहित्यिकांचा समावेश आहे.
संमेलनाचा संपूर्ण खर्च हा मान्यवर पाहुण्यांच्या देणगीतून केला जातो. आतापर्यंत झालेल्या संमेलनामध्ये ‘बहर’, ‘अक्षय’, ‘निरंतरा’ असे सहा विशेषांक प्रकाशित करण्यात आले आहेत. अकादमीतर्फे दरवर्षी आचार्य अत्रे पुरस्कार, आदर्श समाजसेवक पुरस्कार, तसेच तालुक्यात दहावीच्या परीक्षेत प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले जाते. संमेलन चार सत्रांमध्ये विभाजित असते, ज्यात उद्घाटन, परिसंवाद, काव्यगायन आणि मनोरंजन यांचा समावेश असतो.
श्री सुब्रह्मण्य साहित्य अकादमीमध्ये रामू गुंडप, पीटर डिसोझा, नारायण मोरे, परशराम कोलकर, रामा पवार, आर. जी. शिंदे, यल्लाप्पा शिंदे, महादेव मोरे यांच्यासह स्थानिक मंडळे व गणेशोत्सव मंडळ, श्री सुब्रह्मण्य मंदिर जीर्णोद्धार समिती, दुर्गामाता युवक मंडळ, आणि माचीगड व अनगडी गावातील नागरिकांचा मोलाचा सहभाग आहे.
अकादमीच्या अध्यक्ष बाबूराव पाटील यांनी सांगितले की, यंदाही संमेलनामध्ये महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांना निमंत्रित करण्यात येणार असून, त्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे.