निलावडे: आंबोळी येथे वायर जोडताना वायरमॅन चा मृत्यू
खानापूर: तालुक्यातील निलावडे ग्रामपंचायत अंतर्गत आंबोळी येथे खांबावरील वायर जोडत असताना कंत्राटी कामगार मंजुनाथ बसप्पा कुरबार (वय 19 रा. कितूर, ) हा खांबावरून खाली पडून विजेच्या धक्क्याने मरण पावला आहे.
याबाबत ची माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून कणकुंबी, जांबोटी परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या भागातील अनेक खांब उन्मळून पडले. त्यामुळे या भागातील गावांचा वीजपुरवठा पाच दिवस खंडित झाला होता. परंतु निलावडे गावात बारा वर्षांतून एकदा यात्रा होत असल्याने हे खांब उभे करून विद्युत वाहिन्या जोडण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू होते.
रविवारी निलावडे ग्रामपंचायत क्षेत्रातील आंबोळी, कान्सुली परिसरात वीज वाहिनी जोडण्याचे काम सुरू झाले. रविवारी सायंकाळपर्यंत वीज वाहिन्या जोडत असताना सायंकाळी साडेसहा वाजता अचानक विजेचा तडाखा सुरू झाल्याने विजेच्या खांबावर चढत असलेल्या मंजुनाथ कुरबार यांना विजेचा धक्का लागून ते खांबावरून खाली पडले. आणि गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच उपचार अयशस्वी ठरल्याने रविवारी, 26 मे रोजी रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे खानापूर पोलिसांनी कंत्राटदार व सुपरवायझर वरती गुन्हा दाखल केला आहे. याबाबत खानापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. सोमवारी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.