झुंजवाड येथे विजेचा झटका लागून युवकाचा मृत्यू
खानापूर: पावसामुळे एका घरातून दुसऱ्या घराला लाईट पेटवण्यासाठी घेण्यात आलेल्या विद्युत भारित तार लोखंडी पत्र्याला टच झाल्याने त्या पत्र्याच्या खाली थांबलेल्या एका विवाहित युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल खानापूर तालुक्यासह झालेल्या वादळी पावसामुळे एका युवकाचा बळी गेल्याची घटना खानापूर तालुक्यातील झुंजवाड (KN) या ठिकाणी घडली आहे. या घटनेत मृत्युमुखी युवकाचे नाव मोहन (दीपक) नारायण पाटील (वय 38) रा. झुंजवाड असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार श्री. सुरेश पाटील यांच्या झुंजवाड येथे नव्याने बांधलेल्या घराचा वास्तुशांती होता. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास वास्तुशांती सोहळ्यानंतर जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमहि पार पडला त्यानंतर कार्यक्रमाला वापरली गेलेली सर्व भांडी जवळच्या शेडखाली ठेवली होती. अधूनमधून पाऊस पडत असताना काही लोक त्या शेडखाली आसरा घेत होते. त्यावेळी श्री.सुरेश पाटील यांच्या घरात प्रकाश देण्यासाठी घेतलेली विद्युत तार तेथे ठेवलेल्या पत्र्यामध्ये अडकली. भार वाहून नेणारी विद्युत तार अडकल्याने शॉर्टसर्किट होऊन शेडखालील लोकांना विजेचा धक्का बसला. त्या शेडशेजारी उभ्या असलेल्या दिपक नारायण पाटील यांचा वायरच्या संपर्कात येऊन विजेचा जोराचा धक्का बसला. दुर्दैवाने लहान मुलांसह पाच ते सहा जणांना विजेचा धक्का बसला. त्यानंतर वीजपुरवठा खंडित केला गेला.
दीपकला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तो डॉक्टरांकडे पोहोचण्याआधी मृत झाला होता. त्यानंतर दीपक पाटील यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी खानापूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.
या घटनेनंतर दीपक पाटील यांच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार केल्याने निष्काळजीपणासाठी घरमालक सुरेश पाटील यांना जबाबदार धरण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Shocking.. 🙄